समता विचार प्रसारक संस्था गेली २९ वर्षे प्रामुख्याने ठाण्यातील लोकवस्त्यामधील मूला मुलींसाठी शैक्षणिक, सामाजिक संस्कृती परिवर्तनाचे काम करणारी संस्था म्हणून परिचित आहे. सामाजिक समता, स्त्री पुरूष समानता, तृतीयपंथी समाज, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, कष्टकरी महिलांचे सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाला गवसणी, पर्यावरण रक्षण, अक्षय ऊर्जा अशा व्यापक व सामाजिक एकजूट व समतेच्या प्रश्नांवर तसेच समविचारी संस्था संघटनांच्या उपक्रमात सक्रिय सहभाग अशा प्रकारे संस्थेचे काम चालते. राष्ट्रीय स्तरावर संस्था मेधा पाटकर आणि सहकार्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या जन आंदोलनचा राष्ट्रीय समन्वयशी संलग्न असून स्थानिक स्तरावर जाग (Joint Action and Awareness Group) शी संबधीत आहे. रचना संघर्ष एकसाथ हा संस्थेचा आग्रह आहे.
संस्थेने सुरू केलेल्या एकलव्य गौरव पुरस्कारामूळे संस्थेची ठाणे परिसरात एक वेगळी ओळख आहे. वस्तीतील यूवा-महिलामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक काम संस्था गेले अनेक वर्षे करत आहे. सामाजिक वंचित शोषित युवकांना केवळ गौरव पुरस्कार नव्हे तर प्रस्थापित व्यवस्थांशी मुकाबला करण्यासाठी सक्षम बनवणे हे ध्येय ठेवून एकलव्य सक्षमीकरण योजना, नाट्यजल्लोष, क्रीडा स्पर्धा, समता संस्कार शिबीर अशा योजना राबवीत आहे. ज्येष्ठ साहित्यिक व संवेदनशील नाटककार रत्नाकर मतकरी व प्रतिभा मतकरी यांच्या प्रेरणेने बालनाट्य संस्थेच्या सहकार्याने गेल्या ७ वर्षापासून संस्थेने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सूरू केलेला वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्यजल्लोष या आगळ्यावेगळ्या उपक्रमास व्यापक स्तरावर घेऊन जाण्यासाठी जिल्ह्यातून, महानगरातून लोकवस्त्यांमध्ये त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.